पटना - बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) पक्षाला आज मोठा धक्का बसला. पक्षाच्या आठपैकी पाच आमदारांनी नितिश कुमार यांच्या सत्ताधारी जनता दल युनाईटेड(जेडीयू) पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला खिंडार पडली आहे.
आरजेडी पक्षाचे सचिव एस. एम. कमर आलाम यांच्यासह पाच आमदारांनी विधान परिषदेचे अध्यक्ष अवदेश नरेन यांच्याकडे राजीनामा सोपवला. संजय प्रसाद, राधा चरण सेठ, रनविजय कुमार सिंग आणि दिलीप राय या चार आमदारांनी राजीनामा दिला. जेडीयू पक्षातील प्रवेशाला अध्यक्ष नरेन यांनी परवानगी दिली.
माजी केंद्रिय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी राजीनामा दिला. त्यांना कोरोनाची लागण झाली असून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. पत्राद्वारे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. पक्षामध्ये चुकीच्या लोकांना प्रवेश दिला जात असल्यावरून ते नाराज होते.
रामा सिंग या नेत्याला आरजेडी पक्षात प्रवेश देण्यावरून रघुवंश सिंह यांना धक्का बसला होता. रामा सिंह हा एकेकाळी माफिया होता. मात्र, नंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात असताना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रघुवंश सिंह यांचा पराभव केला होता. अशा नेत्याला पक्षात प्रवेश देण्यावरून रघुवंश सिंह नाराज होते.