बिजापूर (छत्तीसगड) - येथील एका नक्षलवादी जोडप्याने शनिवारी सीआरपीएफ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गोपी आणि त्यांची पत्नी भारती अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपये असे इनाम जाहीर केेले होते. मात्र, त्यांनी शनिवारी सीआरपीएफच्या पोलीस उप महानिरीक्षक कोमल सिंह आणि अधीक्षक कमलोचन कश्यप यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दोघा पती पत्नीने शरणागती पत्करल्यावर पोलिसांनी त्यांनी प्रोत्साहनपर प्रत्येकी 10 हजार रुपये दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार नक्षलवादी टोळी क्रमांक 2 चा सदस्य असलेल्या गोपी मोडियम (उर्फ मंगल) चेरकंटी येथील रहिवासी होता. 2002 ला गणेश अण्णा याने त्याला नक्षली चळवळीत भरती करून घेतले होते.
नक्षलवाद्याने दंतेवाडा येथील गिदम पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता, ओडिशातील कोरपूटमध्ये त्याने हत्यारांची तस्करी केली. तसेच बिजापूरच्या बुधराम राणा या नेत्याची हत्या केली होती. तसेच बिजापूरमधील वेगवेगळ्या गुन्हेगारी कटामध्ये गोपी प्रत्यक्ष सामील होता. तसेच त्याच्यावर जवळपास 73 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच पोलीस प्रशासनाने त्याच्यावर 5 लाख रुपयांचा इनाम जाहीर केला होता.
गोपीची पत्नी भारती कट्टम ही सुद्धा त्याच्यासोबत नक्षली कारवायांमध्ये सामील होती. सुकमा जिल्ह्यातील रायगुडा गावातील ती रहिवासी आहे. तिला पकडण्यासाठीही पोलिसांनी 2 लाख रुपयांचा इनाम जाहीर केला होता. तिच्यावर सलवा जुडूम नेत्याची हत्या करणे, मुरकीनार कॅम्पवरील हल्ला अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणामध्ये सामील असल्याचा आरोप आहेत. तसेच चार गुन्हेही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत.