भूवनेश्वर - वय हा फक्त आकडा असल्याचे ओडिशातील एका व्यक्तीने दाखवून दिले आहे. जर तुमच्यात इच्छाशक्ती आणि यशस्वी होण्याची जिद्द असेल तर तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर यशाचे शिखर गाठू शकता. जय किशोर प्रधान या ओडिशातील निवृत्त बँक कर्मचाऱ्याने वयाच्या ६४ व्या वर्षी नीटची परीक्षा पास केली आहे. त्यामुळे साठीनंतरही ते एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी पात्र झाले आहेत.
भारतातील वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना
प्रधान यांनी ओडिशातील वीर सुरेंद्र साई विद्यापीठात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. भारताच्या वैद्यकीय शिक्षणाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना असल्याचे बोलले जात आहे. जिवंत असेपर्यंत लोकांची सेवा करण्याची इच्छा प्रधान यांनी व्यक्त केली आहे. त्यांची प्रयत्नांची पराकाष्टा अनेकांना नक्कीच प्रेरणा देईल.
स्टेट बँकमधून झाले निवृत्त
जय किशोर प्रधान यांचे शिक्षण विज्ञान शाखेतून झालेले असून स्टेट बँक ऑफ इंडियात त्यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नीट परीक्षा देण्याच निर्णय घेतला. कारण, नीट परीक्षा देण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. सप्टेंबरमध्ये लागलेल्या निकालात त्यांना चांगले मार्क मिळून व्हीआयएमएसएआर विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
खुद्द कॉलेजचे प्रमुख ललित मेहर यांनी ६४ वर्षांच्या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे. देशातील वैद्यकीय शिक्षणातील ही एक दुर्मिळ घटना आहे. या वयात एमबीबीएसला प्रवेश घेवून त्यांनी सर्वांपुढे उदाहरण ठेवले आहे, असे मेहर म्हणाले.
मुलीच्या मृत्यूनंतर मिळाली शिक्षणाची प्रेरणा -
माझ्या जुळ्या मुलींपैकी एकीचा मृत्यू झाल्यानंतर नीटची परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. आता एमबीबीएस होवून डॉक्टर बनणार असल्याचे ते म्हणतात. एमबीबीएस पास होईपर्यंत प्रधान ७० वर्षांचे होतील. डॉक्टर होऊन आर्थिक फायदा मिळवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. मला फक्त जनतेची सेवा करायची आहे, असं ते म्हणतात.