नवी दिल्ली - येत्या मार्चपासून 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होतील. 100 रुपयांच्या नवीन नोटा वापरल्या जातील, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) महाव्यवस्थापक बीएम महेश यांनी दिली. नोटाबंदीला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रात्री आठ वाजता पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
जिल्हा पंचायत नेत्रावती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकिंग सुरक्षा व रोख व्यवस्थापन बैठकीत त्यांनी संबोधीत केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या चलनात असलेल्या 100 च्या बहुतेक नोटा बनावट असल्याने जुन्या 100 रुपयांच्या नोटा मागे घेण्यात येतील. गेल्या 6 महिन्यांपासून आरबीआय त्यांचे मुद्रण करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय फक्त नवीन नोटा चलनात आणण्यासाठी घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
100 रुपयांची नवी नोट -
भारतीय रिझर्व्ह बँकने दोन वर्षांपूर्वी 100 रुपयांची नवी नोट चलनात आणली होती. ही नोट चलनात आल्यानंतरही आधीच्या 100 रुपयाच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकने स्पष्ट केले होते. ही नवी नोट फिक्कट जांभळ्या रंगाची आहे. नोटेमध्ये अशोक स्तंभ तर नोटेच्या मागील बाजूस राणीच्या विहिरीचे चित्र आहे