नवी दिल्ली - पत्रकारिता क्षेत्रात स्वत:ची विशिष्ट ओळख निर्माण करणारे एनडीटीव्ही वाहिनीचे संपादक रवीश कुमार यांना आशिया खंडाचा 'नोबेल' म्हणजेच २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी भाषिक वाहिनीमध्ये पत्रकारितेसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार संस्थेने ट्वीटमध्ये लिहिले, की ज्यांना आवाज नाही, अशांसाठी आवाज बनलेल्या रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येत आहे. रवीश कुमार यांची मुख्य भूमिका असलेले 'प्राईम टाईम' आणि 'आम लोगों की वास्तविक' कार्यक्रमाचे कौतुक संस्थेने केले आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणारे रवीश कुमार भारताचे सहावे पत्रकार आहेत. याआधी अमिताभ चौधरी (१९६१), बीजी वर्गीज (१९७५), अरुण शौरी (१९८२), आर. के लक्ष्मण (१९८४) आणि पी. साईनाथ (२००७) यांना पुरस्कार मिळाला आहे.
रवीश कुमार यांनी १९९६ साली पत्रकारितेला सुरुवात केली. आपल्या रिपोर्टींगद्वारे त्यांनी समाजस्तरावरील अनेक प्रश्नांना हात घातला. रवीश की रिपोर्ट हा त्यांचा कार्यक्रम बराच गाजला. यानंतर, त्यांनी अॅकरिंग करत अनेक मुद्दे जनतेसमोर आणले. सत्तेच्या विरोधात त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पत्रकारिता केली. रवीश कुमार यांच्या व्यतिरिक्त स्वे वि (म्यानमार), अंगखाना नीलापजीत (थायलंड), रेमुंडो पुजांते कैयाब (फिलीपिन्स) आणि किम जोंग कि (दक्षिण कोरिया) यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.