नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून जोरदार राजकारण सुरू असतानाच सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची स्तुती केली आहे. तसेच, इंदिरा यांनी वीर सावरकरांना सन्मानित केले होते, असे ते म्हणाले.
'इंदिराजीही वीर सावरकरांच्या अनुयायी होत्या. कारण त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. त्यांनी अणू परीक्षणही करण्याची प्रकल्पाला मंजुरी दिली. हे सर्व नेहरू आणि गांधी दर्शनाच्या विरोधी होते,' असा दावा रणजित सावरकरांनी केला आहे.
रणजित यांनी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाही टोला लगावला आहे. 'सावरकरांचे विचार होते. जेव्हा तुम्ही घराबाहेर येता, तेव्हा तुम्ही हिंदू किंवा मुस्लीम नसता. तुम्ही फक्त भारतीय असता. याचे ओवेसी यांनी पालन केले पाहिजे,' असा सल्लाही रणजित यांनी दिला.
'सावरकरांना जात, धर्म, लिंग यांच्यावर आधारित भेदभाव मान्य नव्हता. सर्वांनी संसदेत यावे, असेच त्यांना वाटत होते. सावरकरांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही,' असे रणजित यांनी म्हटले आहे.
ॉमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात वीर सावरकरांना 'भारतरत्न' देऊ असे म्हटले आहे. यानंतर जोरदार घमासान सुरू झाले होते.