जयपूर - चीनने भारतावर हल्ला करून खूप मोठा गुन्हा केला आहे. मात्र, हा हल्ला होणार आहे? याची माहिती भारताच्या इंटलिजन्सला नव्हती का? त्यांनी केंद्र सरकारला माहिती दिली नव्हती का? तसेच केंद्र सरकारने आपल्या जवानांना अपुरे शस्त्र घेऊन का पाठवले. त्यांना शस्त्रांसह बॅकअप आर्मी फोर्स का पुरवले गेले नाही? सरकारमधील कोणी जवानांना आदेश दिला?, असे सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित करत केंद्र सरकारला धारेवर धरले. आज त्यांनी जयपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
१५ जूनला भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये आपल्या २० जवानांना वीरमरण आले. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती साधे दुःख सुद्धा व्यक्त केले नाही, असा आरोप देखील सुरजेवाला यांनी केला. या काळात पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन चीनविरोधात त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. आपले पंतप्रधान जवळपास १८ वेळा चीनच्या राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्यानंतर चीनचा भारतातील व्यापार दुप्पट झाला आहे. तसेच चीनमधून आवक देखील दुप्पट झाली आहे. आता चीनने हल्ला केल्यानंतर त्यांना कसा धडा शिकवायचा? हे पंतप्रधानांनी ठरवायला पाहिजे, असेही सुरजेवाला म्हणाले.
चीन आणि भारत सीमावादावर पंतप्रधान शांत बसले आहेत. गेल्या ५२ दिवसांपासून ते हे मानायलाच तयार नाहीत, की चीनने आपल्या भूभागावर ताबा मिळवलाय. आता आपल्या जवानांना वीरमरण आल्यानंतर तरी पंतप्रधानांनी जनतेसमोर येऊन चीनने आपला किती भूभाग हडपला आहे? हे सांगावे. मात्र, पंतप्रधान जनतेसमोर येण्यास घाबरत आहे, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.