नवी दिल्ली – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चीनी अन्नपदार्थावर बहिष्कार टाकावा, अशी नागरिकांनी विनंती केली आहे. सर्व रेस्टॉरंटमधून चीनी अन्नपदार्थ विकण्यावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, की जे रेस्टॉरंट चीनी अन्नपदार्थ विकत आहेत, त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी. राज्य सरकारने आदेश देवून ते रेस्टॉरंट बंद करावीत. जे लोक चीनी अन्न खातात, त्यांनी त्यावर बहिष्कार घालावा, असे आठवले यांनी आवाहन केले.
चीनमधून भारतात आणण्यात येणारे साहित्य आणि उत्पादनांवर बंदी घालावी, अशीही मागणी त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, चीनच्या कंपन्यांना भारतामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येवू नये. ती उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या आपण देशात विकसित करण्याची गरज आहे.
चीनने त्यांच्या कृतीचा पुनर्विचार करावा, असा त्यांनी इशारा दिला. सीमेवरील कुटील कृत्य चीनने थांबवावे. तुम्ही आमच्याकडून बुद्ध घेतला. पण, आम्हाला तुमच्याकडून युद्ध घेण्याची इच्छा नाही. युद्ध हे दोन्ही देशांना महागात पडणार आहे. दोन्ही देशांची आर्थिक आणि जीवितहानी होणार आहे. जर आम्ही भारतीय सीमारेषा ओलांडत नाही, तर तुम्ही तसे का करत आहात, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. त्या घटनेत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनच्या 43 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सूत्राने सांगितले होते. गेली काही महिने चीनकडून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक तणावाची स्थिती निर्माण केली जात आहे.