नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमारांनी कितीही सभा घेऊ द्या, त्याने काहीही फरक पडणार नाही. एनडीए आधीच हरली आहे. त्यांना या सभांचा काहीही फायदा होणार नाही. नितीश कुमारांच्या कामामुळे जनता नाराज आहे, याची त्यांना जाणीव झाली आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाचे प्रवक्ते नवल किशोर यांनी केली.
नितीश कुमार यांना जाणीव झाली आहे की, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जनता मतदान करणार नाही. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींवर अवलंबून आहेत. मागील सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदींनी बिहारसाठी काहीही केले नाही. त्यामुळे एनडीए बिहार निवडणुकीत अपयशी होईल, हे नक्की आहे, असे किशोर म्हणाले.
नितीश कुमाराच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात बिहारमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी दर आहे. गरीबांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे नितीश कुमारांना खाली खेचण्याची मानसिकता नागरिकांची आहे, असे ते म्हणाले.
काय म्हणाले मोदी ?
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार बिहारी जनतेने केला आहे, जंगलराजमध्ये बिहारचा विकास होणार नाही, असे मोदी आज जाहीर सभेमध्ये म्हणाले. त्यांनी बिहारमधील तीन जिल्ह्यात जाहीर सभा घेत महागठबंधनवर हल्लाबोल केला.