नवी दिल्ली- रशियाच्या दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या 75 व्या वर्षानिमित्त 24 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह यांचा हा रशिया दौरा तीन दिवसांचा आहे. यापूर्वी भारताच्या तिन्ही सेनादलाच्या जवानांचे संयुक्त पथक शुक्रवारी मॉस्कोला रवाना झाले आहे.
24 जूनला मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर होणाऱ्या संचलनात भूदल,नौदल, हवाई दल या भारतीय सेनादलांचे संयुक्त पथक सहभागी होणार आहे. या पथकामध्ये कर्नलपदावरील अधिकाऱ्यांसह 75 जण सहभागी झाले आहेत.
रशियाच्या दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर मिळवलेल्या विजयाबद्दल आयोजित कार्यक्रम मॉस्कोमधील रेड स्क्वेअरमध्ये 9 मे रोजी होणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता, असे रशियन वृत्तसंस्थेने सांगितले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी 75 वा विजय दिवस साजरा करण्यासाठी 24 जूनचा दिवस निवडण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. 24 जून 1945 ला विजयी सैनिकांचे संचलन पार पडले होते. रशियाच्या सैंनिकांनी मॉस्को, लेनिनग्राड, स्टॅलिनग्राडच्या संरक्षणसाठी लढा दिला होता. पुतीन यांनी रशियाच्या सेनादलाच्या प्रमुखांना 24 जूनच्या सैन्यदलाच्या संचलनात आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचे आदेश दिले आहेत.