जयपूर - राजस्थानच्या करोलीमधील बुकना गावात ७ ऑक्टोबरला एका पुजाऱ्याची जाळून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, गावकऱ्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बुकना गावातील राधा-गोपाळ मंदिराचे पुजारी बाबू वैष्णव आणि आरोपी कैलाश मीणा यांच्यात जमिनीवरून वाद झाला होता. त्यानंतर केलाश मीणा आणि इतर काही लोकांनी पुजारी वैष्णव यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान बाबू वैष्णव यांचा जयपुरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात ८ ऑक्टोबरला मृत्यू झाला. बाबू पुजारी हत्याकांडाविरोधात देशभरातील पुजारी एकत्र झाले आहेत. त्यांनी पीडित पुजाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. आता हळूहळू हे प्रकरण वाढत चालले आहे.
राजस्थान सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मृत पुजाऱ्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, या मागणीसह राज्यसभा खासदार डॉ. किरोडी लाल मीणा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आंदोलन केले. जोपर्यंत मदत जाहीर होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली. त्याला गावकऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला.
जिल्हा प्रशासनाने या मागण्या मान्य करत पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देत नोकरी देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर बाबू पुजारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावकऱ्यांनी आरोपीला व त्याच्या कुटुंबाला टाकले वाळीत -
बाबू पुजारी हत्याकांडानंतर ईटीव्ही भारतने मुख्य आरोपी कैलाश मीणाच्या मुलीशी संवाद साधला. तिने सांगितले की, गावकऱ्यांनी तिच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. तिने असाही दावा केला आहे की, तिच्या वडिलांनी पुजाऱ्याला नाही मारले. त्यांनी स्वत:च अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते.
न्याय नाही मिळाला तर करणार आत्महत्या -
आरोपीच्या मुलीने म्हटले की, त्यांनी जळणाऱ्या पुजाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिच्या वडिलांचा हातही भाजला आहे. मात्र, गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तिच्या वडिलांनाच आरोपी मानले आहे. गावात त्यांना ना पाणी भरू दिले जाते, ना दुकानातून सामान. शासनाने लवकरात लवकर तिच्या वडिलांना व भावाला न्याय दिला नाही तर, आत्महत्या करण्याचा इशारा मुलीने दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही तिने केली आहे.
व्हिडीओ व्हायरल -
सध्या सोशल मीडियावर सपोटरा परिसरातील एका पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती बाटलीत पेट्रोल घेऊन जाताना दिसत आहे. ज्या दिवशी ही घटना झाली त्यादिवशीचे हे फुटेज आहे. असे म्हटले जात आहे की, पेट्रोल नेणारा व्यक्ती हा पुजारी बाबू आहे. हे फुटेज पोलीस आणि सीआयडीला देण्यात आले आहे. मात्र, या फुटेजची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.