करौली - राजस्थानच्या करौली शहरातील सपोटरा मंदिरातील पुजाऱ्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले. मंदिराच्या पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले होते. या पुजाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्याच्या मृतदेहासह धरणे आंदोलनाला बसले होते. या कुटुंबाला १० लाख रुपयांची नुकसान भरपाई, पीडित कुटुंबातील एकाला नोकरी आणि येथील ठाणेअधिकारी आणि पटवारी यांना काढून टाकण्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे येथील धरणे आंदोलन संपले आहे.
शनिवारी राज्यसभा खासदार डॉ. किरोडी लाल मीणा हेही मृताच्या कुटुंबीयांसह धरणे आंदोलनाला बसले होते. मीणा मागणीच्या वेळेस सांगितले होते की, तीन तासांपेक्षा जास्त वेळ या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मृतदेहासह धरणे आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, आता मीणा यांनीच धरणे समाप्तीची घोषणा केली आहे.
पीडित कुटुंबाला 10 लाखांचे आर्थिक सहाय्य, कुटुंबातील एकाला नोकरी आणि ठाणे अधिकारी आणि पटवारी यांना हटवणे या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
काय आहे प्रकरण...
बुधवारी जिल्ह्यातील सपोटरा तहसीलमधील एका गावात मंदिरातील पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गुरुवारी गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याचा जयपूरमधील सवाई माधोसिंह रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात या विषयावरुन राजकारण पेटले आहे. विरोधकांनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
करौली जिल्ह्यातील सपोटरा तहसील अंतर्गत बुकना गाव येते. या गावात राधागोपाल मंदिर असून बाबूलाल वैष्षव मंदिराचे पुजारी होते. मंदिराच्या जागेजवळच ते घर बांधणार होते. त्यासाठी जमीन समतल करण्याचे काम सुरू होते. मात्र, गावातील काही नागरिकांना ही गोष्ट खटकली होती. काही दिवसांपूर्वी २०-२५ लोकांनी बाबूलाल यांना घर बांधण्यावरून धमकी दिली होती. तसेच परिणाम भोगावे लागतील, असा दम भरला होता.
गावगुंडांनी पंचाचेही ऐकले नाही
धमकी दिल्यानंतर पुजारी बाबूलाल यांनी हे प्रकरण गावातील पंचायतीपुढे नेले होते. पंचांनी पुजाऱ्याच्या बाजूने निर्णय देत या गावगुंडांना समज दिली होती. मात्र, तरीही त्यांनी पुजाऱ्याचा राग मनात धरला होता. ७ ऑक्टोबरला पेट्रोल टाकून या गावगुंडांनी पुजाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहे. मागील दोन दिवसांपासून ज्या रुग्णालयात पुजाऱ्यावर उपचार सुरू होते, त्याच्या बाहेर कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यास अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.