जयपूर - राजस्थान गुप्तचर विभागाने दोन आरोपींना अटक केली आहे. राजस्थानातील विविध सैन्य तळांवर लष्कराच्या कारवायांची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली. चिमणलाल आणि विकास तिलोटिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
राजस्थान इंटेलिजेंसचे एडीजी उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य विशेष शाखेला सैन्याच्या कारभाराविषयीची अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर नागरी संरक्षण कर्मचारी विकास तिलोटिया आणि चिमणलाल नाईक या संशयितांना बिकानेर संयुक्त चौकशी केंद्रात आणले गेले.
या दोघांच्याही हालचालींवर नजर ठेवली गेली. त्यांच्याकडून मिळालेल्या फोनची तपासणी केली असता सोशल मीडियाचा वापर करत दोघांनीही पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याचे समोर आले. यानंतर दोघांवरही गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हेरगिरी करण्याच्या आणि गोपनीय माहिती देण्याच्या बदल्यात विकास तिलोटिया आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात होते. सध्या दोन्ही आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली जात आहे. यात अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.