जयपूर – राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बरान जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर 19 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेवरील अत्याचाराची घटना शहाबाद परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे.
शहाबादचे सर्कल अधिकारी काजोडमाल यांच्या माहितीनुसार अत्यंत गंभीर जमखी अवस्थेत पीडितेला बारान जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडितेला कोटामधील जे. के. लोन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पीडितेवर बुधवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेवर आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली.
गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर हरीप्रसाद राणा यांनी सांगितले. पीडिता ही आदिवासी जमातीची आहे. ती घराबाहेर प्रात:विधीला गेली असताना संशयित आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याचे राणा यांनी सांगितले. आरोपी हादेखील आदिवासी समाजातील आहे. आरोपीने महिला आणि बालकल्याण केंद्रात पीडितेवर अत्याचार केला आहे.
त्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी रडत गेली. तिने घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जवळील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. आरोपीविरोधात मंगळवारी रात्री बलात्काराचा व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.