नवी दिल्ली : देशातील सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. पुढील सूचना येईपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद राहतील. मात्र, ज्या २३० विशेष रेल्वे सध्या सुरू आहेत त्या अशाच कायम राहणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यासोबतच, महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार सुरू करण्यात आलेल्या मुंबईमधील लोकल रेल्वेही सुरू राहणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या देशभरातील विशेष रेल्वेंची मागणी पाहून, गरज भासल्यास आणखी विशेष रेल्वेही सुरू केल्या जाऊ शकतात. मात्र नियमीत प्रवासी वाहतूक अद्याप सुरू करण्यात येणार नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १२ मे नंतर १२ विशेष प्रवासी मजूर रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या, आणि १ जूननंतर १०० विशेष प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबईमधील गरज पाहता, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी लोकलही कालांतराने सुरू करण्यात आल्या होत्या.