पाली (राजस्थान) - ऑटिज्म आजाराने बाधित असलेल्या देशभरातील मुलांना आता पालीच्या सादडी गावातून उंटाचे दूध मिळू शकणार नाही. रेल्वेकडून सेतू योजनेद्वारे यापूर्वी दूध पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत होती.
आता रेल्वेकडून ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटिज्म आजाराने ग्रस्त मुलांना उंटाचे दूध कसे मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई, भुवनेश्वर, हैदराबाद आणि दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्ये या आजाराने बाधित मुलांसाठी उंटाचे दूध पोहोचवण्यात येत होते.
मुंबईमधील एका तीन वर्षीय बालकाला अन्नपदार्थांची अॅलर्जी असल्याने त्याला वाचवण्यासाठी उंटाचे दूध गरजेचे होते. यासाठी त्याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत उंटाचे दूध उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने लक्ष देत सादडी येथून उंटाचे वीस लिटर दूध आणि दोन किलो दूध पावडर या महिलेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या महिलेने पंतप्रधान आणि त्यांच्या अधिकारी वर्गाचे आभार मानले.
या महिलेच्या ट्विटनंतर देशभरात 3 हजारहून अधिक ऑटिज्म आजाराने ग्रस्त मुलांसाठी उंटाचे दूध पोचवण्यासाठी रेल्वेकडून सेतू योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे अशा बाधित मुलांना उंटाचे दूध मिळत होते. मात्र, काही कारणास्तव रेल्वेकडून ही योजना बंद करण्यात आल्यामुळे आता या मुलांना उंटाचे दूध मिळणे अवघड झाले आहे.