नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद हा महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ सालापर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. आज (शुक्रवार) खासदार डॉ. विकास महात्मे यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोयल यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत लिखित स्वरुपात माहिती दिली.
पियूष गोयल म्हणाले, मुंबई-अहमदाबाद ५०८ किलोमीटरच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून पूर्ण करण्यात येणार आहे. तर, प्रकल्पासाठीची आर्थिक आणि तांत्रिक मदत जपान करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण १,०८,००० कोटी एवढा खर्च येणार आहे. जूनपर्यंत प्रकल्पावर ३ हजार २२६ कोटी रुपये खर्च झाला आहे.
बुलेट ट्रेनचे जाळे देशभरात विस्तारण्याबाबत गोयल म्हणाले, बुलेट ट्रेन हा प्रकल्प राबवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाबरोबर मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. त्यामुळे, बुलेट ट्रेनचे प्रस्ताव हे आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्यास इतर ठिकाणी राबवले जाऊ शकतात.