नवी दिल्ली - काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. हिंसाचार निवळल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने हा दौरा केला. बृजपुरी येथे जाळपोळ करण्यात आलेल्या एका शाळेला राहुल गांधींनी भेट दिली. 'शाळा दिल्लीचे भविष्य असून द्वेष आणि हिंसेने शाळेला नष्ट केले आहे, याचा भारत मातेला काहीही फायदा नाही, असे माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 46 वर; 254 गुन्हे दाखल, तर 903 जणांना घेतले ताब्यात
'येथे सर्वांनी मिळून प्रेमाने काम करण्याची गरज आहे. देशाला एकमेकांशी जोडून पुढे जाता येईल. दिल्ली हिंसाचाराच्या घटनेने जगातील भारताच्या प्रतिमेला नुकसान पोहचले आहे. बंधुभाव आणि एकता आपली ताकद आहे, तिला येथे जाळण्यात आले, या घटनेमुळे भारत माता आणि हिंदुस्थानचे नुकसान झाले', असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा - #दिल्ली हिंसाचार : गोकुळपूरी अन् भगीरथीविहार कालव्यामध्ये आढळले 3 मृतदेह
राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, खासदार अधीर रंजन चौधरी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, खासदार के. सुरेश, गौरव गोगोई यांनीही परिसराची पाहणी केली. दिल्ली हिंसाचारावर संसदेत चर्चा करण्याचा मुद्दा काँग्रेसने लावून धरल्याचे राहुल गांधींनी सकाळी सांगितले होते. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दिल्ली हिंसाचाराच्या घटनेवरून भाजपला कोंडीत पकडले आहे. संसदेतील गोंधळानंतर अनेक वेळा राज्यसभेतील आणि लोकसभेतील कामकाज ठप्प करण्यात आले आहे.
२३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, करवालनगर, बाबरपुरा, गोकुलपूरी, सिलमपूर आणि आजूबाजूच्या परिसरात सीएए कायद्याविरोधात हिंसाचार उसळला होता. यामध्ये ४५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात खासगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.