नवी दिल्ली - काँग्रेसकडे फक्त ५२ खासदार असले म्हणून काय झाले. परंतु, आपण सर्वजण शूर सिंहासारखे संविधानाचे आणि व्यवस्थेचे रक्षण करू. यावेळी भाजपला संसदेतून पळ काढण्याची कोणतीही संधी द्यायची नाही, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांना उद्देशून केले आहे.
राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला आहे. परंतु, परंपरागत अमेठीचा गड त्यांना राखता आला नाही. यावेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. ६ महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. परंतु, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत आहे.
सोनिया यांची संसदीय नेतेपदी निवड
आज सकाळी झालेल्या काँग्रेस बैठकीत सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. प्रत्येक खासदाराने हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुमच्यातील प्रत्येकजण संविधानासाठी लढत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण संसदेत आहोत. हे लक्षात ठेवा, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.