गांधीनगर : ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांच्या रुपाने राहुल गांधींनी आपले दोन्ही हात गमावले आहेत, असे मत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केले आहे. तसेच अशा रितीने कमकुवत झालेली काँग्रेस ही भाजपसाठी फायद्याची आहे, असेही ते म्हणाले.
मध्यप्रदेशमध्ये काय झाले ते आपण सर्वांनी पाहिलेच. आता त्याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत आहे. यातून हेच दिसून येते की काँग्रेसच्या नेतृत्त्वात काहीतरी चुकीचे आहे, असे पटेल यावेळी म्हणाले.
ज्योतिरादित्य सिंधियांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसला मध्य प्रदेशमधील सत्ता गमवावी लागली होती. त्याप्रमाणेच पायलटही राजस्थान काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचे नेतृत्त्व करत आहेत. मंगळवारी त्यांनाही राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले आहे. ज्योतिरादित्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पायलट यांनी असे काही होण्याची शक्यता फेटाळली आहे.
पायलट आणि सिंधिया हे राहुल यांच्या दोन हातांप्रमाणे होते. आता राहुल यांनी आपले दोन्ही हात गमावले आहेत. काँग्रेसच्या या स्थितीबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे, असे पटेल म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे कमकुवत असणे हे भाजपसाठीच फायद्याचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी हार्दिक पटेलची गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्याबाबतही काँग्रेसवर टीका केली.