नवी दिल्ली - राहुल गांधी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, येथे तुम्हाला कोणीही सहकार्य करणार नाही. हे ब्रिटिश काळासारखे आहे. परंतु, त्यावेळीसही आपल्याला एकाही संस्थेने सहकार्य केले नव्हते. यानंतरही आपण लढलो आणि जिंकलो होतो. यावेळीसही आपण पुन्हा जिंकणार आहोत.
राहुल गांधी म्हणाले, लोकसभेत ५२ खासदार असतानाही पक्ष पुढील ५ वर्षात भाजप विरुद्ध एका इंचासाठीही लढेल आणि जिंकेल. गेल्यावेळेस काँग्रेसचे ४४ खासदार होते. तर, भाजपाचे २८२ खासदार होते. मला वाटले कठीण काम आहे. परंतु, काही आठवड्यातच मला असे वाटले, की आपले ४४ खासदार भाजपच्या २८२ खासदारांना टक्कर द्यायला पुरेसे आहेत.
तुम्हांला आधी तुम्ही कोण आहात हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही लढायला जाताना कोणाविरुद्ध लढत आहात हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही भारताच्या संविधानासाठी लढत आहात. तुम्ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी लढत आहात, असे राहुल गांधी खासदारांना उद्देशून म्हणाले.
राहुल म्हणाले, निवडणुकीत काही जुने नेते जिंकले असते तर बरे झाले असते. कारण मागील कार्यकाळात काही ५ ते १० असे नेते होते ज्यांनी काँग्रेसला संसदेत चांगले सहकार्य केले होते. आज ते आपल्यात नाही याचे दुख: आहे. परंतु, ते वैचारिकरित्या आजही आपल्यासोबतच आहेत.