नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी बिहार मधील काँग्रेस नेत्यांशी ऑनलाईन संवाद साधला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडून ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे राहुल गांधी म्हणाले.
आपण निवडणूका लढवू आणि सरकार बनवू असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. यासाठी लोकांच्या मध्ये मिसळून काम करण्याची गरज गांधी यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी रामविलास पासवान माझ्या संपर्कात असल्याचे सांगितले. यामुळे पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, पासवान यांच्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करण्यास वेळ मिळाला नसल्याचे अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितले. पासवान यांच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.