नवी दिल्ली - 'एकीकडे बेटी बचाओ-बेटी पढाओ हे विशेष अभियान नरेंद्र मोदी सरकार चालवत आहे. दुसरीकडे एखाद्या भाजप आमदाराने एखाद्या भारतीय महिलेवर बलात्कार केल्यास तिने प्रश्नही विचारू नये, प्रतिकारही करू नये, असे वातावरण आहे,' असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघातात या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा मृत्यू झाला. तसेच, पीडितेसह वकीलही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भाजप आमदार कुलदीप सिंग सेनगर हा या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो बंगारमाऊ येथील आमदार आहे. त्याला मागील वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने अटक केली होती.
या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तर, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढत आहे. बलात्कार प्रकरणातील पीडितेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले होते.