नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोदींच्या केदारनाथ यात्रेलाही त्यांनी नाटक असे संबोधले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून निवडणुकीचे नियमन, ईव्हीएम गोंधळ, तसेच निवडणुकांच्या तारखा यांचे सोयीस्कर आयोजन केले असल्याचा आरोप सरकार आणि निवडणूक आयोगावर केला. तसेच आचरासंहितेच्या काळात 'नमो टीव्ही', 'मोदी आर्मी' आणि आता केदारनाथमधील नाटकबाजी हे निवडणूक आयोगाने मोदींसमोर शरणागती पत्करल्याचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. जर निवडणूक आयोग अशाच प्रकारे दबावाच्या स्थितीत राहिला तर त्याची प्रतिष्ठा राहणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका केली होती. दिल्लीतील १७ मे रोजी झालेल्या एका संम्मेलनात राहुल गांधी म्हणाले होते की, निवडणूक आयोगाचे पंतप्रधान आणि भाजपसाठी वेगळे नियम व कायदे असून इतर विरोधी पक्षांसाठी वेगळी नियमावली असल्याचे सांगत आयोग भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय मोदींना प्रचारासाठी सोयीस्कर ठरतील अशा तारखाच निवडणुकीसाठी ठरवल्या गेल्याची टीकाही त्यांनी केली.