नवी दिल्ली - राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनरावलोकन याचिका ऐकणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुनरावलोकन याचिका लवकरात लवकर ऐकावी, अशी विनंती वकील प्रशांत भूषण यांनी केली होती.
या याचिकेच्या सुनावणीसाठी एखादी निश्चित तारीख देणे तसेच या सुनावणीसाठी विशिष्ट खंडपीठ नेमणे कठीण असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले होते. मात्र, आपण स्वत: याप्रकरणात लक्ष घालणार असल्याचेही गोगोई यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सध्या न्यायालयात ४ याचिका आहेत. यापैकी एक सरकारनेच दाखल केलेली आहे.
राफेल कराराबाबत 'कॅग'चा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला होता. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चूक झाली, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. राफेल विमान खरेदीच्या निर्णय प्रक्रियेवर शंका घ्यावी, असे कुठलेच पुरावे उपलब्ध नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी डिसेंबर २०१८ मध्ये दिलेल्या निकालात म्हटले होते. यावर ही आम्हाला दिलेली क्लिनचिट आहे, असे केंद्राने म्हटले होते.
दरम्यान, प्रशांत भूषण यांनी पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. राफेल प्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर चुकीची तथ्ये मांडली, असा आरोप काँग्रेसने केला होता.