भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेला 'चतुर्भुज सुरक्षा संवाद' (क्वाड) म्हणजे सैन्य युती नसल्याचे कॅप्टन (रि.) डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय नौदलाचे माजी प्रवक्ते असलेले शर्मा यांनी वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांना दिलेल्या एका मुलाखतीत हे स्पष्ट केले. भारत-जपान-अमेरिका या देशांदरम्यान होणारा युद्धसराव हा वर्षागणिक अधिक चांगला होत आहे. या युद्धसरावात ऑस्ट्रेलियाने अजून सहभाग घेतला नाही ही चिंतेची बाब नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाहूया काय म्हटले आहे त्यांनी, या विशेष मुलाखतीत...
'क्वाड'ला परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर नेणे कितपत महत्त्वाचे ठरत आहे?
चतुर्भुज सुरक्षा संवादाला परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर नेण्याने नक्कीच फायदा होत आहे. मात्र, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की हे फक्त युद्धसरावाबाबत आहे. क्वाड म्हणजे 'सैन्य युती' नाही. मलबारमधील युद्धतळाच्या मुद्यावरुन आता जपानदेखील यामध्ये सहभागी झाला आहे. ऑस्ट्रेलियाशी भारताचा २०१४, २०१६ आणि २०१९ मध्ये द्विपक्षीय संवाद झाला. त्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार आपण ऑस्ट्रेलियासोबतही युद्धसराव करतो आहोत.
चीनच्या ७०व्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांनी बऱ्याच अद्ययावत शस्त्रांचे प्रदर्शन केले, त्यातून त्यांना जगाला काय दाखवून द्यायचे होते?
चीन एक महासत्ता आहे, आणि त्यांना त्यांच्या ताकदीचे प्रदर्शन करायचे होते. आपणही अभिमानाने आपल्याकडील शस्त्रांचे प्रदर्शन करतो. मात्र, जगात कोणत्याही ठिकाणी केवळ तीस मिनिटांमध्ये पोहोचणारे क्षेपणास्त्र असणे ही धोक्याची बाब आहे. या क्षेपणास्त्रामुळे चीन नक्कीच पहिल्याहून अधिक शक्तीशाली झाला आहे हे नक्की.
भारत आणि अमेरिकेच्या तीनही दलांतील संयुक्त युद्धसराव कितपत महत्त्वाचा ठरेल? जागतिक स्तरावर भारत अमेरिकेच्या गटामध्ये मोजला जातो आहे का?
सर्वप्रथम, भारत आणि अमेरिकेमध्ये कोणताही युद्धकरार किंवा युती झालेली नाही. त्यामुळे एखाद्या गटात किंवा एखाद्या विशिष्ट बाजूमध्ये मोजले जाण्याचा प्रश्नच नाही. भारत आणि अमेरिकेमधला युद्धसराव हा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. केवळ अद्ययावत शस्त्रांचा सराव व्हावा, आणि नवनवीन युद्धपद्धती माहित व्हाव्यात यासाठी हा किंवा कोणत्याही देशासोबतचा युद्धसराव होत असतो. केवळ आपल्या सैनिकांना, लष्कराला विविध युद्धकौशल्यांचा सराव व्हावा यासाठी हे आयोजित करण्यात येते.
मलबामधील युद्धसराव गेल्या काही वर्षांमध्ये कशा प्रकारे आकार घेत आहे?
भारत आणि अमेरिकेमध्ये १९९० साली झालेल्या द्विपक्षीय चर्चेनुसार, मलबार युद्धसराव सुरू झाला होता. आता याला जवळपास दोन दशके होत आहेत. सुरुवातीला या सरावाचे प्रमाण आणि आवाका फार छोटा होता. मात्र, तेव्हाच्या अमेरिकेच्या सैन्याचा आवाकाही एवढा होता की भारत त्याची बरोबरी करु शकत नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अमेरिकेकडून बरीच युद्धकौशल्ये शिकून घेतली आहेत. अमेरिकेनेही भारताकडून वेगवेगळी रणनीती शिकून घेतली आहे. यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेचा भारतावरील विश्वासदेखील वाढला आहे. भारत आणि अमेरिकेच्या नौदलाचा आत्मविश्वास आणि परस्परांवरील विश्वास वाढत आहे. मात्र, एक गोष्ट मी पुन्हा सांगू इच्छितो, की हे युद्धसराव म्हणजे केवळ सराव आहेत, अमेरिकेच्या सैन्यासह वा नौदलासह कोणत्याही प्रकारची युती भारताने केली नाहीये. त्यामुळे हे सराव म्हणजे कोणत्याही विशिष्ट देशासाठी कोणताही इशारा नाहीत.
चीनला याप्रसंगी काय संदेश द्याल..?
२००८ मध्ये समुद्रात चाचेगिरीचे प्रमाण वाढले होते. तेव्हा गल्फमध्ये भारतीय नौदल एक जहाज पाठवत. त्यानंतर चीननेही चाचेगिरीला आळा घालण्याचे कारण पुढे करत चार ते पाच जहाजे आणि नंतर पाणबुड्या पाठवायला सुरु केले. सर्वांनाच समजत होते की पाणबुड्या या चाचेगिरीवर आळा घालण्याच्या उद्देशाने नाहीयेत पाठवल्या जात. तेव्हा जर चीनला खरोखरच समुद्री चाच्यांविरोधात काम करायचे असेल, तर त्यांना इतर देशांसह मिळून काम करावे लागेल. अन्यथा चीनबद्दल भारताला बाकी देशांसह बोलणी करून निर्णय घ्यावा लागेल.
अरबी समुद्रात भारतापुढे कोणते सर्वात मोठे आव्हान आहे..?
अरबी समुद्राचे बोलाल तर भारतापुढे कोणतेच आव्हान नाही. अरबी समुद्रात सध्या भारतच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या नौदलाकडे पुरेसा आणि अत्याधुनिक असा शस्त्रसाठा उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीनंतर मदत करण्यास भारतीय नौदल सर्वात आधी उपलब्ध होते. त्यामुळे श्रीलंका, मालदीव, मादागास्कर, सेशेलस, मॉरिशस, बांग्लादेश किंवा म्यानमार कोठेही कसलीही अडचण आली, तर भारत या लहान देशांच्या मदतीला तातडीने जाऊ शकतो. शिवाय, चीनप्रमाणे आपण कोठेही जाऊन कोणताही भाग ताब्यात घेत नाही. त्यामुळे या देशांनाही आपल्यावर विश्वास आहे.
हेही वाचा : भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषद : गैरसमज अन् अस्वस्थता दूर करण्याची संधी