नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी विविध मुद्यांवर पत्रकार परिषद घेत, काँग्रेसवर निशाणा साधला. पंजाबच्या होशियारपूरमधील बलात्कार प्रकरणात काँग्रेसच्या मौनावर सीतारमन यांनी निशाणा साधला. ज्याप्रकारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस बलात्कार प्रकरणात सक्रियता दाखवली. त्याचप्रकारे होशियारपूर आणि राजस्थान बलात्कार प्रकरणात काँग्रेस गप्प का, असा सवाल सीतारामन यांनी केला.
पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका स्थलांतरित मुजराच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. आरोपींनी बलात्कारानंतर पीडित मुलीला जाळून मारून टाकले. निर्मला सीतारामन यांनी या घटनेचा उल्लेख करत, राहुल गांधींवर टीका केली. होशियारपूर प्रकरणात बहाणेबाज काँग्रेस गप्प आहे. ऊठ-सूट टि्वट करणाऱ्या राहुल गांधींनी याप्रकरणात कोणतेही टि्वट केले नाही. यावेळेस तर ते एखाद्या टूरवरही गेलेले नाहीत.
सोनिया गांधींवरही सीतारामन यांची टीका -
काँग्रेस पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत. त्यांनी अशा काही निवडक घटनांवर प्रतिकिया देणे, पक्षाला शोभत नाही. मात्र, भारतीय पक्ष होशियारपूरच्या पीडित कुटुंबासोबत असून त्यांना न्याय देऊ इच्छित आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस नेहमीच माध्यमांच्या स्वातंत्र्याचा ढोल पिटवत असते. मात्र, आणीबाणीच्या काळात माध्यमांसोबत काय झाले आणि काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये पत्रकाराला कशी मारहाण झाली, हे सर्वश्रुत आहे.
तेजस्वी यादव यांचे होशियारपूर बलात्कारावर मौन -
निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला. बिहारच्या स्थलांतरित कामगाराच्या मुलीवर बलात्कार झाला. मात्र, तेजस्वी यादव या घटनेबद्दल एकही शब्द बोलले नाहीत. तुम्ही पीडित कुटुंबाला उत्तर देण्यास बांधील नाहीत का?, असा सवालही त्यांनी केला.