चंदीगड- केंद्राच्या नव्या शेती कायद्याच्या विरोधात पंजाब विधानसभेत विधेयक मांडण्याची तयारी सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या आमदारांनी सोमवारी विधानसभेतील अमरिंदर सिंग सरकारविरोधात निषेध आंदोलन करत संपूर्ण रात्र विधानसभेच्या आवारात घालविली. शेती कायद्याच्या विरोधात मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावित विधेयकांच्या प्रती आम्हाला द्याव्यात, अशी मागणी आपच्या आमदारांनी सरकारकडे केली.
आप नेते आणि विरोधी पक्षनेते हरपाल चीमा यांनी सांगितले की, “आम आदमी पार्टी कृषी कायद्या विरोधातील विधयकाला पाठिंबा देईल. परंतु सरकारकडून या विधेयकाच्या प्रती आम्हाला पुरविल्या गेल्या नाहीत. आम्हाला इतर विधेयकांच्या प्रतीही देण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत आमचे आमदार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कशी करतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पंजाब विधानसभेच्या विशेष अधिवेशना केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करणारे विधेयक सरकार आज (मंगळवारी) सादर केले जाणार आहे. या विधेयकाच्या प्रती मिळाव्यात अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी ) आपने विधानसभेत केली होती. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला आणि आपच्या सदस्यांनी सभागृहातच धरणे आंदोलन केले. त्यानंतर सभागृह मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही आम आदमी पार्टीचे आमदार विधानसभेत बसून होते. संपूर्ण रात्र त्यांनी विधानसभेच्या आवारातच बसून घालवली.