शिमला - काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांना शिमलाला जाण्यासाठी आणखीन वाट पाहावी लागणार आहे. कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांना शिमल्यात येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. शिमल्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रियंका गांधी यांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. प्रियांका गांधी शिमला येथील छराबडा येथे असलेल्या आपल्या घरी वास्तव्यास येऊ इच्छितात. यासाठी त्यांनी कोव्हिड ई पास नोंदणी अर्जही दाखल केला आहे. या अर्जात प्रियांका गांधी, त्यांची मुले यासह एकूण बारा नावांचा समावेश आहे.
ई पाससाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या कागदपत्रात कमतरता आहे. त्यामुळे सध्या त्यांना शिमला येथे येण्याची परवानगी मिळाली नाही. प्रियांका गांधी यांच्यासोबत येणाऱ्या सदस्यांमध्ये दिल्ली, गुरुग्राम, बंगळुरू आणि नोएडा येथील त्यांच्या काही मित्राचा सहभाग आहे.
प्रियांका गांधी यांनी केलेल्या अर्जात 10 ते 30 ऑगस्ट या कालावधीत शिमला येथे वास्तव्यास येण्याची परवानगी मागितली आहे. तसेच त्यांना शिमला येथे येण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवावा लागणार आहे. जर का त्यांनी कोरोना निगेटिव्ह अहवालासोबत बाळगला नाही तर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल.
प्रियांका गांधी यांनी जिल्हा प्रशासनाला येथील वास्तव्याच्या काळात त्या छराबडा येथील घर सोडून बाहेर कोठेही जाणार नसल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या कालावधीत राजकारणापासून दूर राहण्याच्या हेतूने प्रियंका शिमला येथे येत आहेत. मात्र, सध्या त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.