नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सांयकाळी 5 वाजेपर्यंत 44.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान याने देखील मतदान केले. रेहानने प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेतल्याने खूप चांगले वाटत आहे. सर्वांनी आपला मतदानचा हक्क बजावला पाहिजे. गेल्या लोकसभा निवडणुकीत परीक्षा असल्यामुळे मतदान करू शकलो नव्हतो. प्रत्येकाला उत्तम परिवहन सुविधा मिळायला हव्या. तसेच शिक्षणही मोफत हवे. मी दिल्लीच्या विकासासाठी मतदान केल्याचे रेहान म्हणाला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रेहान मतदाना करू शकला नव्हता. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यावर प्रियांका यांनी उत्तर देताना ‘रेहानची परीक्षा सुरू आहे, त्यासाठी तो लंडनला गेला आहे’ असे सांगितले. परीक्षा सुरू असल्यामुळे त्याला मतदान करता आले नाही, असे स्पष्ट केले होते.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. विधानसभेच्या 2015 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला खाते उघडता आले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सात पैकी पाच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा आहे. मात्र, मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येते.