नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील वकील धर्मेंद्र चौधरी यांच्या मृत्यूवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. शनिवारी धर्मेंद्र चौधरी यांचा मृतदेह आढळून आला होता. राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून राज्यात जंगल राज वाढत असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली.
उत्तर प्रदेशात जंगल राज वाढत असून कोरोना आणि गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणाबाहेर केल्याची टीका प्रियांका गांधींनी केली. धर्मेंद्र चौधरी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह काल सापडला. कानपूर, गोरखपूर आणि बुलंदशहर येथील प्रत्येक घटनेत कायदा व्यवस्थेचा ढिसाळपणा दिसून येत आहे. या घटना जंगल राज वाढत असल्याची चिन्हे आहेत, असे प्रियांका गांधींनी म्हटले. किती दिवस राज्य सरकार झोपेचे सोंग घेणार आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
धर्मेंद्र चौधरी बुलंदशहरमधून 25 जुलै या दिवशी बेपत्ता झाले होते. चौधरी यांचा मृतदेह शनिवारी पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर प्रियांका गांधींनी राज्य सरकारवर टीका केली. मागील काही दिवसांपूर्वी पत्रकाराला त्याच्या मुलीसमोर गोळ्या घालून खून केल्याची घटना उत्तरप्रदेशात घडली होती.