अहमदाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने कैद्यांना मुक्त करण्यास परवानगी दिली आहे. मात्र याच कोरोनाच्या भीतीने काही कैदी तुरुंगातून बाहेर येण्यासच नकार देत आहेत. बाहेर पडल्यानंतर आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यापेक्षा आपण तुरुंगातच जास्त सुरक्षित आहोत असे या कैद्यांचे म्हणणे आहे.
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात असणाऱ्या राजपिपला तुरुंगात हा प्रकार समोर आला आहे. या तुरुंगातील दोन कैद्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही तुरुंग सोडण्यास या कैद्यांनी नकार दिला आहे. बाहेर गेल्यास आपल्यालाही कोरोना विषाणूची लागण होईल या भीतीने त्यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने घेतला होता. यानुसार उच्च आणि जिल्हा न्यायालयांना ठराविक कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना यात प्राधान्य द्यावे असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले होते.
यानुसार राजपिपला तुरुंगातील १७७ कैद्यांना जामीनावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सर्वांना न्यायालयीन कारवाईसाठी सेशन न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी यांपैकी दोन कैद्यांनी मुक्त होण्याऐवजी तुरुंगात राहण्यास पसंती दर्शवली.
हेही वाचा : लॉकडाऊनमुळे वैताग आलाय..? मग 'हे' करा अन् संचारबंदीची मजा घ्या