अहमदाबाद - एच. के. आर्ट महाविद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाने आमदार जिग्नेश मेवानीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्त महाविद्यालाचे प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी राजीनामा दिला आहे. महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवात वडगाम मतदारसंघाचे तरूण आमदार व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जिग्नेश मेवानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, राजकीय परिस्थितीचे कारण देत या कार्यक्रमालाच विश्वतांकडून परवानगी नाकारण्यात आली होती.
महाविद्यालय चालवणाऱ्या ब्रम्हचारी वाडी विश्वस्त मंडळाकडे शाह यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर काहीच तासात उपप्राचार्य मोहनभाई परमार यांनीही राजीनामा दिला. या दोघांनीही महाविद्यालावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्त नैतिकतेचे कारण देत राजीनामा दिला. शाह हे एच. के. आर्ट कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. ते या महाविद्यालयामध्ये गेल्या १५ वर्षांपासून शिकवत असून उपप्राचार्य परमारही गेल्या १० वर्षांपासून या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
सध्याच्या राजकीय वातावरणात संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून सत्ताधाऱ्यांकडून याचे समर्थनही केले जात आहे. या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यामागे एका राजकीय पक्षाकडून दबाव आणला गेल्याचे स्पष्ट आहे. मेवानी हे आमदार असून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळेच त्यांना कार्यक्रमात बोलवण्यात आले होते, असे हेमंत शाह यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे.
जिग्नेश मेवानी यांनीसुद्धा ट्विटरवरून प्राचार्य हेमंत शाह यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी नेत्यांनी मेवानी कार्यक्रमस्थळी आले तर कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली होती. अशा वेळी विश्वस्तांनी खरेतर कार्यक्रमाला परवानगी देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत संरक्षण देण्याची गरज होती, मात्र, धमकीला घाबरून विश्वस्तांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारल्याने आपला भ्रमनिरास झाल्याचे शाह यांनी पत्रात म्हटले आहे.
Conclusion: