नवी दिल्ली - लडाखमध्ये भारत चीन सीमेदरम्यान उद्भवलेल्या गलवान खोऱ्यातील युद्धप्रसंगावर सविस्तर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संध्याकाळी ५ वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार उपस्थित आहेत. तसेच सोनिया गांधीदेखील हजर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत तेलंगणा, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत. यांच्यासोबत अखिलेश यादव, सीताराम येचुरी आणि डी. राजा उपस्थित आहेत. मात्र, आप आणि राजद ला आमंत्रण देण्यात आले नाही.
दरम्यान, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, एमआयएम या पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले नसल्याने, पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये किमान पाच खासदार असणाऱ्या पक्षांनाच या बैठकीला बोलावण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांची झटापट झाली. यानंतर भारतीय लष्कराच्या २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले. यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणल्याचे चित्र आहे. तसेच भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
सीमेवरील झटापटीनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. यावर द्विपक्षीय चर्चा करण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्याप दोन्ही देशांकडून अधिकृत भूमिक स्पष्ट झाल्या नाहीत. चिनी सैन्याच्या या घुसखोरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व यामध्ये तडजोड होणार नसल्याचे सांगितले. तसेच सैन्याला पूर्ण अधिकार दिल्याचे ते म्हणाले. यानंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीची शक्यता आहे. या सर्व घटनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
दरम्यान, सध्या राजधानीत लष्कर प्रमुख मनोज नरवणे तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्याशी देखील पंतप्रधानांची चर्चा झाली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.