मयूरभंज - पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यापासून गावकऱ्यांनी पतीला रोखल्याची धक्कादायक घटना ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील कुचेई गावात घडली आहे. संतापजनक म्हणजे महिलेच्या मृत्यूला तीन दिवस उलटून गेले होते. कांद्रा सोरेने हा संथाल जमातीचा आहे. त्याच्या पत्नीचा 14 ऑगस्टला मृत्यू झाला होता. मात्र, संथाळ परंपरेनुसार कांद्राने लग्नावेळी सासरकडच्यांना गाय आणि बैल दिले नव्हते. परंपरेचा भंग केल्याच्या कारणावरुन कांद्राला गावकऱ्यांनी मदत करण्याचे नाकारले. तसेच पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यापासूनही त्याला रोखले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावकरी दुसऱ्या एका कारणासाठी कांद्रावर नाराज होते. कांद्राच्या वडिलांनी कुळाबाहेर लग्न केले होते. त्यामुळे दंड म्हणून एक बकरी, तीन कोंबड्या, 15 किलो तांदूळ आणि दोन भांडे भरुन दारु देण्याचे ठरले होते. मात्र, कांद्राकडून हा दंड भरण्यात आला नव्हता. त्यामुळे कांद्राला कोणीही मदत करायचे नाही, असे गावकऱ्यांनी ठरवले होते.
कांद्रा हा रोजंदारी मजूर असल्याने तो दंड भरण्यास असमर्थ होता. त्याची पत्नी पार्वती सोरेन काही दिवसांपासून आजारी होती. 14 ऑगस्टला तिचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी ही संधी ओळखत कांद्राकडून दंड वसूल करण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी कांद्राला पार्वतीचे अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले. पोलिसांना याबाबत तीन दिवसांनी माहिती मिळाली. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने पार्वतीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. कांद्रा आणि पार्वतीचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत.
माणूस मंगळावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, असे असताना पृथ्वीवरील एका भागात मरणानंतरही देहाला सुटका मिळत नाही, यासारखी दुसरी लाजीरवाणी बाब नाही, असे म्हणावे लागेल.