वाराणसी - लंडनमध्ये 170 भारतीय कोरोनाच्या संचारबंदीमुळे अडकलेले आहेत. वंदे भारत अभियानानुसार या नागरिकांना परत आणण्यासाठी वाराणसीतील लाल बहाद्दुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण तयारी झाली आहे. वाराणसी विमानतळावर या नागरिकांना उद्या आणले जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर दहशत पसरली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र लंडनमध्ये १७० भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना वंदे भारत अभियानानुसार परत आणण्यात येणार आहे. त्यासाठी वाराणसीतील लाल बहाद्दुर शास्त्री विमानतळावर पूर्ण तयारी झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरनाचे आकाशदीप माथूर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की या भारतीयांना अगोदर दिल्ली येथे आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना दिल्लीवरुन विशेष विमानाने वाराणसी येथील वामिनळावर आणले जाणार आहे. येथील विमानतळावर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सामानही सॅनिटाईज केले जाणार आहे.
सरकारने घालून दिलेल्या नियमाचे योग्य रितीने पालन केले जाणार आहे. या नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी शहरातील ४ हॉटेलची निवड करण्यात आली असून त्याबाबतची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केल्याची माहितीही माथूर यांनी दिली आहे.