नोएडा - गर्भवती महिलेला पाच रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना ग्रेटर नोएडा येथे घडली. आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीने डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तिच्या पती तिला घेऊन जवळपास सहा रुग्णालय फिरला. मात्र, सहाव्या रुग्णालयाच्या गेटवर तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाचे आरोग्य अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी टीम बनवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित महिला ८ महिन्याची गर्भवती होती. तसेच ती गाजियाबाद येथील खोडा कॉलनीमधील रहिवासी होती. तिची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला आणखी ४ रुग्णालयात नेले. तिथेही डॉक्टरांना उपचार न करता परत पाठवले. शेवटी सहाव्या रुग्णालयात नेताना तिने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अखेरचा श्वास घेतला. यामध्ये काही सरकारी रुग्णालयाचाही समावेश असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.
दरम्यान, गर्भवती महिलेवर उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी एल. वाय. सुहास यांनी अप्पर जिल्हाधिकारी मुनींद्र नाथ उपाध्याय आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक अहोरी यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.