आलाप्पुहा (केरळ) - केरळमधील सर्वात मोठी नौका शर्यत म्हणजेच नेहरू ट्रॉफी बोट रेस मागील 67 वर्षांत यंदा पहिल्यांदाच रद्द झाली आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोट रेस समितीने सांगितले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये निराशा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक ही नौका शर्यत बघण्यासाठी गर्दी करत असतात.
नेहरू करंडक रेगट्टा सुरू झाल्यापासून आजवर कधीही रद्द करण्यात आला नव्हता. गेल्या 67 वर्षांची परंपरा यावेळी प्रथमच खंडित होणार आहे. केरळमधील आलाप्पुहा जिल्ह्यातील पुन्नमदा बॅकवॉटर्समध्ये दरवर्षी ऑगस्टच्या दुसर्या शनिवारी ही शर्यत भरते. मागील दोन वर्षांत पुरामुळे शर्यतीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा नेहरू करंडक आयोजित करण्यात आला. यंदा नौका करंडक प्रेमी या पर्वणीला मुकणार आहेत.
आल्लापुहाचे जिल्हाधिकारी ए अॅलेक्झांडर हे केरळ स्नेक बोट रेस स्पर्धेचे संचालक आहेत. त्यांनी गुरुवारी संबंधित स्पर्धा रद्द झाल्याची माहिती दिली.
तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या केरळ भेटीदरम्यान या केरळ स्नेक बोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच केरळ भेट होती. त्यानंतर या ठिकाणी नेहरू करंडकाची सुरुवात झाली. त्यावेळीपासून बॅकवॉटर्समध्ये या स्पर्धेचे न चुकता आयोजन करण्यात येते.
मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नौका शर्यत देखील रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.