नवी दिल्ली - हवेचे प्रदूषण आणि हवेच्या दर्जाचे मानक खालावल्याने लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सध्याची स्थिती याचा पुरावा आहे. सोमवारी हवा प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि इतर राज्यांना चांगलेच धारेवर धरले. संपुर्ण जग आपल्याकडे बघून हसत आहे. तुम्ही लोकांना गॅस चेंबरमध्ये राहायला भाग पाडले आहे. त्यापेक्षा सरळ स्फोटके आणा आणि त्या सर्वांना एकाच झटक्यात मारून टाका, असे म्हणत न्यायालयाने दिल्ली , पंजाब आणि हरियाणा सरकारला फटकारले.
दिल्लीतील लोकांचा श्वास घुसमटला आहे. आदेशानंतरही तुम्ही शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणाऱ्या पराटीवर बंदी का घातली नाही, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाने पंजाब विचारला. दिल्ली नरकापेक्षा वाईट झाली असून सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असे न्यायाधीश अरुण मिश्रा म्हणाले.
तुमच्या नजरेत एका व्यक्तीच्या आयुष्याची काय किंमत आहे, असा प्रश्न न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी सरकारला विचारला. यावेळी न्यायालयाने १० दिवसांत पराळी जाळणे संपूर्णपणे बंद झालेच पाहिजे, अशी सक्त ताकीद राज्याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
दिल्ली शहर आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणेदेखील मुश्कील झाले आहे. वायुप्रदूषणाची स्थिती खालावली आहे. दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ लागला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचे परिणाम दिल्लीकरांना भोगावे लागत आहे.