बुलंदशहर - रविवारी कलेक्टर लॉकडाऊनदरम्यान असलेल्या शहरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. अशात एका पोलीस कर्माचाऱ्याने त्यांची गाडी थांबवली. त्यांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत लॉकडाऊनदरम्यान विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
बुलंदशहरचे डीएम रविवारी लॉकडाऊनदरम्यान केलेल्या व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी खासगी गाडीमधून सिकंद्राबाद ठाण्याच्या परिसरात फिरत होते. यावेळी कामावर असलेले अरुण कुमार यांनी ही गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या व्यक्तींची चौकशी केली. यानंतर लॉकडाऊनदरम्यान तीन ते चार लोकांनी एकाच गाडीतून प्रवास करणे म्हणजे लॉकडाऊनचे उल्लंघन असल्याचे त्यांनी सांगितले. गाडीमध्ये बसलेल्या लोकांनी पोलिसाला या गोष्टीची भनक लागू दिली नाही, की तो डीएमसोबत बोलत आहे.
डीएम या पोलीस कर्मचाऱ्याची कामाप्रतीची निष्ठा आणि सतर्कता पाहून प्रभावित झाले. यानंतर जिल्हा प्रशासनाने सांगितले, की अरुण कुमार यांची ही कामाप्रतीची निष्ठा पाहता त्यांना प्रशंसा पत्र देऊन सन्मानित केले जावे. डीएमनेही या पोलीस कर्माचाऱ्याला पत्र लिहित त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. तर, एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी पोलीस कर्माचाऱ्याला 2 हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.