बंगळुरू - कर्नाटकातील ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी ट्रक चालक बनून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच मागताना पकडले. टी.के. जयन्ना आणि करियप्पा अशी या लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 15 हजार 500 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक रवी डी चन्नानवर यांनी ही कारवाई केली. या प्रकारामुळे कर्नाटक पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे फक्त अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी आहे. इतर वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, यातीलच काही पोलीस कर्मचारी भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून पैसे घेत असल्याची माहिती रवी यांना मिळाली. या प्रकरणाची शाहनिशा करण्यासाठी ते अधिक्षक स्वत: ट्रक चालक बनून अनेकल तालुक्यातील चेक पोस्टवर गेले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.