बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - शहरातील बीबीनगर ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक बिजेंद्र पाल यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. याच ठाण्यातील दुसऱ्या पोलिसाच्या बंदुकीतून ही गोळी चालवण्यात आली. या घटनेनंतर पळून गेलेल्या नरेंद्र सिंगला पोलिसांनी अटक केली आहे.
बुलंदशहरच्या बीबीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक बिजेंद्र पाल यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील दुसऱ्या पोलिसाच्या बंदुकीतून ही गोळी चालवण्यात आली. मृत बिजेंद्र पाल हे पोलीस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर आराम करत होते. त्यावेळी अचानक नरेंद्र सिंग यांच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि बिजेंद्र यांना पोटात लागली.
या घटनेनंतर बिजेंद्र पाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी नरेंद्र पोलिसांना गंडवून फरार झाला. आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरीतून अटक करण्यात आली. आरोपीने गुन्हा कबुल केला असून चुकून गोळी सुटल्याचे मान्य केले.