बिलासपूर (हिमाचल प्रदेश): जिल्ह्यातील कोठीपुरा येथील एम्सच्या बांधकामावर कार्यरत असणारे 200 मजूर शुक्रवारी रात्री चालत त्यांच्या गावाकडे निघाले होते. पोलिसांनी मजुरांना चंदीगढ-मनाली राष्ट्रीय महामार्गावर कल्लर येथे थांबवले. यानंतर मजूर आणि पोलीस यांच्यात तणावाची परिस्थिती तयार झाले होते. मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित शर्मा आणि पोलीस उपअधीक्षक अजय ठाकूर देखील मजुरांना अडवण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचले.
पोलीस आणि मजूर यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मजूर घरी जाण्यावर ठाम होते. कल्लर या ठिकाणी ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी 11 वाजता येथे पोहोचले तेव्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने मजुरांना समजावण्यासाठी उपविभागीय अधिकारी रामेश्वर शर्मा आणि तहसीलदार पोहचले होते.मात्र, मजूर माघारी बिलासपूर येथे जाण्यासाठी तयार नव्हते.
बिलासपूर येथे जाण्यासाठी मजुरांनी 1वाजून 15 मिनिटांनी सहमती दर्शवली. जिल्हा प्रशासनाने एचआरटीसीच्या चार बसेसमधून रौडा सेक्टर येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. एम्सच्या कामावार असणारे मजूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे करत होते. राज्यात परत जाण्याची कोणतीच व्यवस्था होत नसल्याने मजुरांमध्ये संताप निर्माण झाला होता.
कोठीपुरा येथील एम्सच्या कामावार 1200 मजूर कामाला असून त्या सर्वांची गावाकडे जाण्याची इच्छा आहे. मजुरांच्या या मागणीकडे जिल्हा प्रशासन आणि हिमाचल प्रदेश काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.