नवी दिल्ली : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार होणार आहे. हा कार्यक्रम व्हर्चुअली पार पडेल.
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्नासंदर्भात संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल, असे कार्य केले आहे. त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे माजी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील.
अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी १९६२ पासूनच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक असा दस्ताऐवज 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्रात मांडला आहे. या आत्मचरित्रात राज्याच्या आणि देशाच्या सर्वच राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेण्यात आला आहे. वेळोवेळी घ्याव्या लागलेल्या राजकीय भूमिका डॉ.बाळासाहेब यांनी आत्मचरित्रात परखडपणे मांडल्या आहेत.
हेही वाचा : विशेष : दृष्टीहीन, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण ठरलेले 'बाबा सूबा सिंह'