नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' विजेत्या मुलांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी आज(सोमवार) एका व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजता मोदी या मुलांशी संवाद साधतील. देशभरातून विविध गटातील ३२ मुलांची यावर्षीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशाच्या २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील ही ३२ मुले आहेत. कला आणि संस्कृती विभागासाठी ७, संशोधन विभागासाठी ९, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ५, क्रीडा विभागासाठी ७, शौर्यासाठी ३ आणि सामाजिक कार्यासाठी १, असे एकूण ३२ मुलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अॅट होम' या सत्रात आदीवासी निमंत्रीत पाहुणे, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा दलाचे स्वयंसेवक, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱया कलाकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजूजू आणि रेणूका सरूता उपस्थित होते.