नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणूचे संकट याकडे पंतप्रधान मोदी साफ दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते संसदेबाहेर माध्यमांशी बोलत होते.
अर्थव्यवस्थेवर येणार त्सुनामी..
यावेळी अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या शेअर बाजारात काय सुरू आहे हे आपण पाहू शकतो. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ही तर फक्त सुरूवात आहे, नजीकच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठी त्सुनामी कोसळणार असून, परिस्थिती आणखी खराब होईल.
देशाच्या अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांना अर्थव्यवस्थेतील काहीही कळत नाही, आणि पंतप्रधान मोदीही याबाबत अवाक्षरही काढत नाहीयेत, अशी टीका राहुल यांनी केली.
कोरोना विषाणूबाबत बोलताना ते म्हणाले, की याचा अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. सध्या काही करण्यासही खूप उशीर झाला असला, तरीही सरकारने पुढील नुकसान रोखण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे.
हेही वाचा : मध्यप्रदेश सत्तासंघर्ष : मध्यप्रदेश सरकारच्या 2 मंत्र्यांना बंगळुरूमध्ये मारहाण, काँग्रेसचा आरोप