नवी दिल्ली - आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची 56 वी पुण्यतिथी आहे. जवाहरलाल नेहरूंचा 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या अन्य दिग्गज नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू हे एक शूर स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आपले पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारताच्या या महान पुत्राला श्रद्धांजली, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता. जवाहरलाल नेहरूंनी 1916 मध्ये कमला नेहरू यांच्यासोबत विवाह केला. लग्नाच्या एका वर्षांनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. इंदिरा 'प्रियदर्शनी' असे मुलीचे नाव होते. पंडित नेहरू हे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे पहिले व्यक्ती होते. देशसेवेसाठी त्यांना 1955 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.