पणजी - लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी १२ एप्रिलला भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोव्यात येणार आहेत. यावेळी ते प्रचारसभेला संबोधित करतील, असे गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही सभा उत्तर गोव्यात होणार असून अद्याप सभेची जागा निश्चित करण्यात आलेली नाही.
तेंडुलकर म्हणाले, भाजपने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोन्ही मतदारसंघातून उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक तर दक्षिण गोवा मतदारसंघातून नरेंद्र सावईकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी १२ एप्रिल रोजी सकाळी सभा घेणार आहेत.
शिरोडाचे जिल्हापरिषद सदस्य तथा मगोचे कार्यकर्ते जयदीप शिरोडकर यांनी आज तेंडुलकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत दामोदर नाईक यांनी केले. आपल्या भाजप प्रवेशाविषयी बोलताना शिरोडकर म्हणाले, मगोचे नेते ढवळीकर बंधूंनी विधानसभेची उमेदवारी नाकारत अन्याय केला. त्यामुळे पक्षत्याग करत आहे. शिरोडा मतदारसंघात बाहेरील उमेदवार विचार विजयी होऊ देणार नाही.
शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे मगो नेते सुदीन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागले आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.