नवी दिल्ली - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन केल्यामुळे देशातील व्यवहार ठप्प झाले असून पंतप्रधान मोदींनी नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन केले आहे. आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान दुसऱ्यांदा नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
21 दिवसाच्या लॉकडाऊनला अनेक भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरी काही ठिकाणी अजूनही लोकांना परिस्थितीचं पुरेसं गांभीर्य लक्षात आलेले नाही. दरम्यानच्या काळात स्थलांतरित मजूर तसंच गोरगरिबांना झालेल्या त्रासाबाबत, तसेच लॉकडाऊनवर नरेंद्र मोदी बोलतील, याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृहमंत्रालय आणि सर्व राज्य सरकारे मिळून कोरोनाचा सामना करत आहेत. केंद्र सरकाराने कोरोनासंबंधी उपाययोजना लागू करण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना केली आहे. त्याद्वारे वारंवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.