नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगद्या'चे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002मध्ये या बोगद्याची पायाभरणी केली होती. मात्र, त्यांचे सरकार गेल्यानंतर बोगद्याचे काम संथगतीने सुरू होते. त्याच गतीने काम सुरू राहिले असते तर, बोगद्याचे काम 2040पर्यंत पूर्ण झाले असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
देशाचे हित आणि सुरक्षेपेक्षा दुसरे काहीच म्हत्त्वपूर्ण नाही. आज अटल वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले असून हिमाचलवासियांची प्रतीक्षा संपली. तसेच, सुधारणांची जिथे गरज असेल, तिथे सुधारणा करण्यात येतील. पिढ्या बदलत असून बदलत्या काळानुसार विचारही बदलावे लागतील, असे मोदी म्हणाले.
कनेक्टिव्हिटीचा थेट संबंध देशाच्या विकासाशी आहे. कनेक्टिव्हिटी जितकी जास्त, तितका वेगवान विकास. सीमाभागातील संपर्क हा थेट देशाच्या संरक्षण गरजांशी जोडलेला आहे. याप्रकरणी ज्या प्रकारचे गांभीर्य आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक होती, ती दर्शवली गेली नाही, असे मोदी म्हणाले.
भारताची जागतिक भूमिका बदलत असताना आपल्याला त्याच वेगाने पायाभूत सुविधा, आपली आर्थिक आणि सामरिक क्षमता वाढवावी लागेल. स्वावलंबी भारताचा आत्मविश्वास लोकांच्या विचारसरणीचा भाग झाला आहे. अटल बोगदा याच आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.